मास्क न वापरल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यावर FIR, वाढदिवस पडला महागात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रतिनिंधींनी आपले वाढदिवस साधेपणाने साजरे केले. पक्षाचे कार्यक्रमही साधेपणाने होत आहेत. लोकांना मदत करण्यावर लोकप्रतिनिधींचा भर आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (दि.12) गर्दी जमवून दणक्यात वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनाकडे दुर्लक्ष केले. वाढदिवसाच्या दिवशी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि मास्क न लावल्याने आमदार जगताप यांच्यासह त्यांच्या 25 ते 30 कर्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आमदार जगताप यांचे निवावस्थान असलेल्या भागातही फैलाव वाढल्याने तेथे कंटेन्मेंट झोन करण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितित लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदतकार्य़ यावर भर देणे अपेक्षित असताना स्वत: आमदारच नियम मोडत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नियम मोडल्याने व्यापारी किंवा सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते, मात्र काही विशेष लोकांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे. परंतु आ . संग्राम जगताप यांचा शुक्रवारी ( दि .१२ ) वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यक्रमात नियमांचे पालन केले नाही. विनामास्क एकत्र येऊन कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दोन दिवसांनी आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आमदरांनी कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते तर कार्यकर्ते प्रेमापोटी भेटीला आले होते. असा दावा आता आमदार जगताप यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.