Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत हजेरी, ‘त्या’ पत्रकाराविरूध्द FIR दाखल

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका पत्रकाराच्या मुलीला कोरोना संसर्गाची लागण झाली होती.त्यानंतर त्या पत्रकारादेखील त्याचा संसर्ग झाला.या मध्ये विशेष असं की हा कोरोना संसर्गित पत्रकार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेस उपस्थित होता.आता त्या पत्रकारावर पत्रकार परिषदेस उपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल केला आहे.पत्रकाराची मुलगी लंडन वरून आल्याने होम क्वारंटाईन होती,तरीही या पत्रकाराने पत्रकार परिषदेस उपस्थिती लावण्याने पत्रकार व राजकीय नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

देशभरात कोरोनाचे सावट असताना, मध्यप्रदेश मध्ये भाजपकडून कमलनाथ सरकार अस्थिर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्यात येत होते.या दरम्यान, काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार पडले आणि मध्यप्रदेशातील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसला अपयश आल्यामुळे भाजपने बाजी मारली.त्यानंतर कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी भोपाळमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेसह हा कोरोना संसर्गित पत्रकार देखील आला होता तसेच मध्यप्रदेशचेच नाही, तर दिल्लीतील देखील पत्रकार उपस्थित होते.यामुळे आता हा संसर्गित पत्रकार पत्रकार परिषदेस उपस्थित राहिल्याने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही माजी मंत्री,राजकीय नेते,आणि पत्रकारांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची वर्तवण्यात येत आहे.

पत्रकाराने संसर्ग असताना देखील उपस्थिती लावल्याने, शुक्रवारी रात्री त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम १८८,२६९,२७० अंतर्गत संसर्ग असताना निष्काळजीपणा तसेच आघात रोगाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत असल्याचा गुन्हा शामला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे भोपाळ पोलिसांनी सांगितले.

भारतामध्ये कोरोना हात-पाय पसरू लागल्याने त्याचा प्रभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ९३३ वर पोहचली असून,२० जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू देखील झाला आहे.