महाराष्ट्राबाबत थोडं टेन्शन झालं कमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8-10 जिल्हे होते. याच महाराष्ट्राबाबत केंद्राने दिलासायक माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना प्रकरणं कमी झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, देशातील काही राज्यांमधील कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. 27 एप्रिल पासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणं घटल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

राज्यांच्या आकडेवारीनुसार राज्यात नवीन रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागाला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात 60 हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत होती. राज्यात 48 हजार 621 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यात 59 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 40 लाख 41 हजार 158 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.7 टक्के आहे.