Coronavirus : ‘कोरोना’नं पुन्हा मोडला विक्रम, देशात गेल्या 24 तासात 97570 नवे पॉझिटिव्ह तर 1201 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा ग्राफ वेगाने वर जात आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाच्या नव्या केस लागोपाठ 90 हजाराचा आकडा पार करत आहेत. मागील 24 तासात कोरोनाची 97 हजार 570 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 1201 लोकांनी आपला जीव गमावला आहे. नवीन केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 46 लाख 59 हजार 984 झाली आहे. गुरुवारी 96 हजार 551 नवी प्रकरणे समोर आली होती, तर विक्रमी 1209 लोकांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोनाने संक्रमित रूग्ण बरे होण्याचा दर वेगाने वाढत आहे. देशात सध्या कोरोनाच्या 9 लाख 58 हजार 316 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर 36 लाख 24 हजार 196 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत देशात 77 हजार 472 रूग्णांचा जीव गेला आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,91,251 कोरोना तपासणी करण्यात आली, तर आतापर्यंत एकुण 5,51,89,226 लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची विक्रमी 24,886 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या 10,15,681 झाली आहे. आरोग्य विभागानुसार मागील 24 तासात 393 रूग्णांच्या मृत्यूनंतर एकुण मृतांची संख्या वाढून 28,724 झाली आहे. यासोबतच 14,308 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, ज्यानंतर संक्रमणातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 7,15,023 झाली आहे.