Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 35 लाखाच्या पुढं, गेल्या 24 तासात 78761 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मागील 24 तासात 78 हजार 761 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 948 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 35 लाख 42 हजार 733 वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सध्या 7 लाख 65 हजार 302 ऍक्टिव्ह रुग्ण असून, आत्तापर्यंत कोरोनामुळे 63 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत 27 लाख 13 हजार 933 रुग्ण यातून बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाची सर्वाधिक म्हणजे 16,867 रुग्ण वाढले आहेत.

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,64,281 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 24,103 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल एका दिवसात 328 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,85,131 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, आणि 5,54,711 जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये एका दिवसात 1,432 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 जणांचा मृत्यू झाला. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1,43,339 वर पोहचली यामध्ये आत्तापर्यंत 7,596 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या 19,971 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे शहरात शनिवारी 1,972 नवे कोरोना रुग्ण सापडले आणि 32 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 40,12,059 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दिल्लीमध्ये 1,954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दिल्लीमध्ये शनिवारी 1,954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,71,366 वर पोहचली आहे. ऑगस्टमध्ये नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपैकी हा सर्वात मोठा आकडा आहे. दिल्ली आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 4,404 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या 14,040 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राजस्थान मध्ये एका दिवसात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू

राजस्थान मध्ये शनिवारी कोरोनामुळे 13 जणांचा आणि आत्तापर्यंत 1030 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 1407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, एकूण कोरोना बाधितांची संख्या 78,777 वर पोहचली आहे. सध्या 14,776 जण उपचार घेत आहेत. काल मृत्यू झालेले 13 जण जयपूर, कोटा, जोधपूर, धौलपुर, उदयपूर येथील रहिवासी होते.

केरळमध्ये कोरोनाचे 2,397 नवे रुग्ण

केरळमध्ये शनिवारी कोरोनाचे 2,397 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,700 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, राज्यात काल सर्वाधिक म्हणजे 2,225 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 48,083 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 23,277 जणांवर उपचार सुरु आहेत.