Coronavirus : सलग तिसर्‍या दिवशी 8 हजाराहून जास्त ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आतापर्यंत 190535 जण ‘संक्रमित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून देशातील कोरोना बाधितांची संख्या आता १ लाख ९० हजार ५३५ इतकी झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासात २३० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात ४ हजार ८३५ रुग्ण शनिवारी बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात देशात ८ हजार ३९२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. ३१ मे रोजी ८ हजार ३३६ आणि ३० मे रोजी ८ हजार १०५ नवीन रुग्ण आढळून आले होते. देशात आता १ लाख ९० हजार ५३५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९३ हजार ३२२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गेल्या २४ तासात देशभरात २३० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यात महाराष्ट्र ८९, दिल्ली ५७, गुजरात ३१ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत देशभरात ५ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रविवारी एकाच दिवशी ४ हजार ८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत देशभरातील ९१ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

बरे होण्याचा दर आता हळू हळू वाढत असून आता तो ४८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. मात्र, अजूनही एकूण केसेस दुप्पट होण्याचा वेग १५ दिवसांपर्यंतच असल्याने येत्या १५ दिवसाच्या आत आपण इटली, इंग्लड आणि स्पेन या युरोपातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांना मागे टाकून ४ व्या क्रमाकांवर जाण्याचा मोठा धोका आहे.