Coronavirus Impact : गर्दी टाळण्यासाठी मुंबई-पुण्यासह सर्वच रेल्वे स्टेशनवरील ‘प्लॅटफॉर्म’ तिकीट आता 50 रूपयांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून आता 50 रुपये केलं आहे. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आणि टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर सह वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर
अशा सर्व शहरात रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आलं आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये केलं आहे. तब्बल 250 स्टेशन आणि 6 डिव्हीजनमध्ये आता प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांना मिळणार आहे.

रेल्वेचा असा अंदाज आहे की, प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर वाढवल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. येणाऱ्या प्रवाशांमध्येही यामुळं घट होईल. परिणामी जास्त गर्दी होणार नाही. केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता याच्या अंमलबजावणीलादेखील सुरुवात झाली आहे.

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. देशासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर वाढवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.