चाललंय काय ? पवार म्हणतात 5 कोटी, भुजबळ 6 कोटी, राष्ट्रवादी म्हणते 1 कोटी… कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकटाच्या काळात कुणीही उपाशीपोटी राहून नये याकरिता रेशनकार्डधारकांना रेशन दुकानातून गहू , तांदूळ आणि साखर वितरणाचं काम राज्यभरात सुरु आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, १ ते १७ एप्रिल या कालावधीत राज्यातील १ कोटी ४१ लाख ४३ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं आहे. ही माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याचंही या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. परंतु छगन भुजबळ , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढाळते. त्यामुळे राज्यात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय विरोधी पक्ष भाजपने देखील हीच बाब लक्षात घेऊन ‘महाराष्ट्राच्या जनतेची हि दिशाभूल नव्हे का’ ? असा सवालही उपस्थित केला आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. सध्या रेशनवर अंत्योदय कार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असे ३५ किलो धान्य वितरित केले जात आहे. केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू व २ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ वितरण होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विट वरील आकडा

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्यातर्फे या अन्नधान्य वाटपासंबंधीची आकडेवारी रोज प्रसिद्ध केली जाते. १ ते १५ एप्रिलदरम्यान १ कोटी ३५ लाख ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर पेजवरही हाच आकडा आहे आणि हे ट्विट छगन भुजबळ यांनी रिट्विटही केलं आहे.

शरद पवार यांचे ट्विट

हे ट्विट १५ एप्रिल रोजी ७.३५ वाजता करण्यात आलंय. पण त्याआधी त्याच दिवशी दुपारी १.४७ वाजता शरद पवारांनी एक ट्विट केलंय. त्यात आज पर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाल्याचं म्हटलंय. हे ट्विटही छगन भुजबळांनी रिट्विट केलंय. या दोन्ही ट्विटमधील धान्यवाटप झालेल्या नागरिकांच्या आकड्यात मोठी तफावत दिसतेय.

भुजबळांनी मुलाखतीत सांगितला वेगळाच आकडा

त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे, छगन भुजबळांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, १५ दिवसांत राज्यातील ६ कोटी ८० लाख नागरिकांना धान्यवाटप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा आकडा आणखीच वेगळा आणि मोठा आहे.

भाजपने दाखवून दिली आकड्यांमधली तफावत

प्रदेश भाजपानं या सगळ्या ट्विट्सचे स्क्रीन शॉट्स घेऊन राज्य सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मुखपत्र सामना व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत आढळते. ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय.