Coronavirus : ‘कोरोना’विरूध्दची लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीननं जिंकली, WHO नं देखील दिली परवानगी

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाच्या प्रसारामुळे आतापर्यंत ९ लाख ९४ हजार २५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ कोटी २८ लाख ९६३ लोकांना याची बाधा झाली आहे. काही देशात कोरोनाची दुसरी लाट आता येऊ लागली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लस कधी उपलब्ध होईल याकडे लागले आहे. त्यातच चीनमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

चीनचे कोरोनावर विकसित केलेली लस लवकरात लवकरात सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु असलेल्या शर्यतीत बाजी मारल्याचे वृत्त समोर आलं आहे. आपण विकसित केलेली लस चाचणी व्यतिरिक्त इतर मोजक्या लोकांनाही देण्याचा निर्णयाला जागतिक आरोग्य संघटनेने पाठींबा दिला असल्याचा दावा चीनने केला आहे. याबाबत चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने माहिती दिल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

चीनने चाचणी व्यतिरिक्त इतर विविध समूहातील लोकांनाही कोरोना लसीचे डोस दिले होते. पण संशोधकांनी चीनच्या या निर्णयावर टीका केली होती. चीनने आपत्कालीन मान्यतेच्या अंतर्गत जुलै महिन्यातच आवश्यक सेवांशी संबंधित लाखो कर्मचारी आणि हाय रिस्क ग्रुपमधील अनेक लोकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात केली होती. मात्र, चीनच्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल समोर आला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे असिस्टंट डायरेक्टर जनरल डॉ. मरिअनजेला सिमाओ म्हणाले, विविध देशांना आपल्या वैद्यकीय उत्पादनाचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी देण्याचा अधिकार आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले, कोरोना विषाणूवरील लसीचा आपत्कालीन परिस्थितीतील वापरला दिलेली मान्यता हा एक तात्पुरता उपाय आहे. दीर्घकालीन लसीच्या वापरासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होणे गरजेचे आहे.

चीनने कोरोनावरील आपल्या तीन लसींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यात सीएनबीजी, सिनोव्हॅक या लसींचा समावेश आहे. तर कॅनसिनो कंपनीच्या लसीला लष्करी वापरासाठी परवानगी दिली आहे. चीनचे राष्ट्रीय आरोग्य अधिकारी झेंग झोंगवेई यांच्या मतानुसार, २०२० च्या अखेरीस चीनकडे एका वर्षात ६१ कोटी लसींचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. तर २०२१ पर्यंत ही क्षमता एक अब्ज लसी विकसित करण्यापर्यंत जाईल.