Coronavirus : कोरोनाची लढाई आणखी मोठी आणि कठीण होणार, सज्ज रहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ठाकरे सरकारने राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन केलं आहे. एकिकडे कडक निर्बंध असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. संजय ओक, शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. राहुल पंडित उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोरोनावर अद्यापही हमखास औषध आपल्याकडे नाही, कोविडच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोरोनाची प्रचंड दहशत होती, आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठी आणि भयानक आहे हे जाणवू लागले आहे. आपण यावर न डगमगता पाऊले टाकली, असे मुख्यमंत्री उद्धव टाकेर यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाची लढाई मोठी आणि भनयानक व जिवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमूख म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी आपल्याला साद घालत आहे. मागील वर्षी आंधार असताना तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाली. आपल्याकडे उपचार पद्धती काय असली पाहिजे, कशावर कोणतं औषध आणि किती प्रमाणात द्यावं यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. प्रत्येकाकडे आपला एक डॉक्टर असतो, त्याचा सल्ला घेऊनच लोक निर्णय घेत असतात. आपल्याला देखील कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते. त्या माझ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावे. चला, सर्वांच्या सहकार्यातून कोरोना विषाणुचा नायनाट करुया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आता शिवधनुष्य उचललं पाहिजे

मुख्यमंत्री म्हणाले, 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. मात्र काही दिवसांनी मृत्यूदर वाढत असल्याचे लक्षात येते. तेथील डॉक्टर सांगतात की रुग्ण उशीरा आला. घरच्या घरी काही गोष्टी अंगावर काढल्या जातात. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणू शकतो. ही लक्ष्मणरेषा ओळखायची कशी हे काम तुम्ही करायचं आहे. घरच्या घरी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचललं पाहिजे. घरी उपचार घेणारे रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र त्यांच्या उपचारांवर लक्ष दिले पाहिजे. त्यांना योग्य औषधे दिली गेली पाहिजेत. यासाठी तुम्हाला काम करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

रुग्णाच्या शरीरातील साखर स्थिर ठेवणे गरजेचे

कोविडमुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते, त्यात रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे, घरच्याघरी रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी घेतलेल्या फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

परीक्षा कठीण होणार आहे

चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळळला असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. 1 जूनपासून पावसाळा सुरु होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचं आव्हान असणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी टस्क फोर्सला दिला.

तो देव तुमच्या रुपात मला दिसतोय

आपल्याला जे काही समर्थन लागणार असेल तर ते देण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. संपूर्ण ताकद दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. तो देव तुमच्या रुपात मला दिसतोय. देव असतो तिथे यश मिळतं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी

कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व डॉक्टरांना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली. माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथल्या, त्यांच्या परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दिवसाला एकदा तरी जाऊन आपली सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यामुळे शासनाला सहकार्य तर होईलच पण आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना मिळेल.

फॅमिली डॉक्टरची भूमी महत्वाची

पावसाळा येत आहे. पावसाळ्यात अनेक साथीचे आजार येतात. लिप्टो, मलेरिया, डेंग्यु यासोबत ताप, सर्दी, खोकला असे आजार येतात. या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मोठे आव्हान आपल्या समोर आहे. यामध्ये माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खुप महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सैनिकाप्रमाणे युद्धात उतरा

राज्यातील सर्व डॉक्टर्स आपल्या स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सैनिकाप्रमाणे या युद्धात उतरले आहेत, शासन तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य शासन करेल. तुमच्या अडचणींची जाणीव आहे, त्या सोडवण्यासाठी शासन प्राधान्य देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.