Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’ क्लस्टरमध्ये ‘बंदीस्त’ !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोनाचे नव्याने सापडणारे ९० टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधून आहेत. राज्यातील इतर भागातून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत कमी झाल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांवर पोचली आहे. राज्यातील पहिली रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर ५१ दिवसांनी राज्यात दहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या ५१ दिवसांपूर्वी कोरोनाच्या सुरू झालेल्या उद्रेकाची सद्य स्थिती जाणून घेऊयात

राज्यात सुरुवातीला पुणे – मुंबईसह यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आठ आठवड्यांपूर्वी दिसत होते. सध्या राज्यात ३३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. पण, इतर जिल्ह्यांमधील कोरोनाचा फैलाव टप्प्या-टप्प्याने नियंत्रित होतोय. जिल्ह्यांमध्ये नवीन हाँटस्पाँट तयार होत नाहीत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळणारे रुग्ण हे त्याच हाँटस्पाँटमधील आहेत, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या. शहरांतर्गत भाग सील केले. उद्रेक झालेली ठिकाणे, सर्वाधिक रुग्णसंख्येची ठिकाणे निश्चित केली. त्या भागात निर्जंतूकीकरण आणि सोशल डिस्टसिंगमुळे शहरांच्या इतर भागात कोरोना पसरला नाही. त्या मुळेच कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला नाही.

महाराष्ट्रापुढे सध्या कोणते आव्हान असेल ते म्हणजे पुणे -मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव रोखने. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या दोन शहरांमध्ये सुरुवातीला सोसायट्यांच्या भागात रुग्ण आढळले. पुण्यात सिंहगड रस्ता, कोरेगाव पार्क येथे रुग्णांचे निदान झाले. त्यानंतर चौथ्या आठवड्यापासून कोरोनाचे हाँटस्पाँट शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात स्थलांतरित झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती त्याच भागातून आहे. या दोन शहरांमधून रोज ९० टक्के नवीन रुग्णांचे निदान होते.

राज्यात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडल्या ठिकाणी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६६४ कंटेनमेंट झोन आहेत. त्यात नऊ हजार ३६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३८.३० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

सद्यस्थिती बघता महाराष्ट्रातील २ ते ३ शहरे सोडली तर महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आला आहे.