COVID-19 : ‘कोरोना’चे जगभरात ‘थैमान’ ! तब्बल 5,97,458 लोकांना ‘संसर्ग’, 27,370 जणांचा ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. आता चीन यातून सावरला असला तरी जगातील इतर देशांमध्ये मात्र परिस्थिती अतिशय भयंकर आहे. अमेरिका, इटली, स्पेन यासारख्या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचा सामना करण्यासाठी २१ दिवसांकरिता संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

इटलीमध्ये कोरोनाचा हाहाकार
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 9134 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये 3295, अमेरिकेत 1704, स्पेनमध्ये 5138, इराणमध्ये 2378, फ्रान्समध्ये 1995, जर्मनीमध्ये 391 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे.

इटलीनंतर अमेरिका आणि स्पेन कोरोनाचे शिकार
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसनं कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. जगभरात या धोकादायक विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये अमेरिकाही आघाडीवर आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात 569 लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या 4,934वर गेली आहे. दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे.