काँग्रेसने मध्य प्रदेशची ‘जबाबदारी’ सोपवली ‘या’ मराठी नेत्याकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी आणि काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मागील महिन्यात मध्य प्रदेशमधील सत्ता गमवावी लागली होती. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये पक्षाला पुन्हा बळकटी देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेस 15 वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पेक्षा अधिक जागा जिंकून काँग्रेसने मध्य प्रदेशात सत्ता मिळवली होती. राज्यातील ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मात्र काँग्रेसकडे स्वबळावर स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांची खूर्ची सुरुवातीपासूनच डळमळीत होती. अखेरीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि आमदारांच्या एका गटाने केलेली बंडखोरी यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले आणि त्या ठिकाणी भाजप सत्तेत आले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर लागलेल्या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी आणि पक्षांतरामुळे विस्कटलेली प्रदेश काँग्रेसची घडी बसवण्याचे आव्हान मुकुल वासनिक यांच्यासमोर असणार आहे.