Coronavirus : अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू, कोरोना मृतांचा आकडा 3 लाखांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. एकीकडे नव्या रुग्णांची नोंद कमी होत असताना दुरीकडे मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. गत दोन महिन्यातील आकडेवारी पाहिली तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत सहा लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे तर ब्राझीलमध्ये ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला असून भारतात ३००३१२ इतक्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर मेक्सिकोत २.२१ लाख, इंग्लंड १.२७ लाख, इटली १.२५ लाख, रशिया १.१८ लाख आणि फ्रान्समध्ये १.०८ लाख लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असे असले तरी भारताचा मृत्युदर अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. इटली २.९९ टक्के, इंग्लंड २.८७ टक्के, ब्राझील २.७९ टक्के, जर्मनी २.३९ टक्के, रशिया २.३५ टक्के, स्पेन २.१९ टक्के, फ्रान्स १.८५ टक्के, अमेरिका १.७८ टक्के, भारत १.१२ टक्के आणि तुर्कीचा मृत्यूदर ०.८८ टक्के आहे. देशात १०० रुग्णांमागे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. देशात सर्वाधिक मृत्यू दुसऱ्या लाटेतील आहेत.

सातव्या दिवशीही रुग्णसंख्या ३ लाखांच्या आत
देशात गेल्या २४ तासात दोन लाख ४० हजार ८४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार ७४१ जणांचे मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार सलग सातव्या दिवशी रुग्ण तीन लाखांच्या खाली आले आहे. देशात एकूण मृतांची संख्या २,९९,२६६ तर एकूण रुग्णांची संख्या २,६५,३०,१३२ झाली आहे. २८ लाख ५ हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. बाधितांच्या संख्येत टक्केवारी १०.५७ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. दोन कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर देशात मृत्यूदर १.१३ टक्के आहे. २२ मेपर्यंत ३२ कोटी ८६ लाख ७ हजार ९३७ नमुन्यांची तपासणी केली असून त्यात शनिवारी तपासलेल्या २१ लाख २३ हजार ७८२ नमुन्यांचाही समावेश असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.