Coronavirus : आता मुंबईतील कोरोना रूग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमधील रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच रोज नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांपेक्षा दरदिवशी कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील घटू लागली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्केवर गेला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर गेला आहे. तर ६ ते १२ ऑगस्टपर्यंत शहर, उपनगरात एकूण कोरोनवाढीचा दर ०.८० टक्के झाला आहे.

मुंबईत १२ ऑगस्टपर्यंत कोरोनाच्या ६ लाख २९ हजार ८९९ चाचण्या करण्यात आल्या. तर गुरुवारी दिवसभरात १२२० रुग्ण आढळले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २७ हजार ५५६ झाली असून एकूण बळींचा आकडा ६ हजार ९९१ झाला आहे. आतापर्यंत १ लाख ९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १९,३१४ रुग्णांवर मुंबईतील वेगवगेळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसभरात झालेल्या ४८ मृतांपैकी ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३० पुरुष व १८ महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी चार जण ४० वर्षाखालील होते. ३५ जणांचे वय ६० वर्षाहून अधिक होते. तर बाकीचे नऊ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

गुरुवारी राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक ४१३ रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यू दर हा ३.४ टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत राज्यात १९ हजार ६३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर गुरुवारी राज्यात ११ हजार ८१३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८.८२ टक्के इतके आहे.

गुरुवारी राज्यातून ९ हजार ११५ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. आतापर्यंत एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६९.८ टक्के झालं आहे. राज्यात एकूण १ लाख ४९ हजार ७९८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत २९ लाख ७६ हजार ९० प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ५ लाख ६० हजार १२६ चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.