Coronavirus : कळंब शहरात ‘कोरोना’चे 15 दिवसामध्ये 2 रूग्ण, पण गर्भश्रीमंतांना एक अन् सर्वसामान्यांना दुसरा ‘न्याय’ ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सरकार कोणाची गय करत नसताना स्थानिक प्रशासन मात्र दुजाभाव करत असून, गर्भश्रीमंतांना एक न्याय आणि गरिबांना दुसरा न्याय आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात इतके दिवस रुग्ण नव्हते. आता कळंब शहरात गेल्या 15 दिवसांच्या आत दोन रुग्ण आढळले आहेत. त्यात शहरातील मोठ्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अधिकृतरित्या रात्री समजले. पण ही माहिती शहरासह कुटुंबाला होती. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार प्रशासनास कळण्यास 48 तासांचा कालावधी लागला आहे. त्यानंतर हा प्रकार समोर आला तरी देखील पालिका, जिल्हा प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. कारण, अद्यापही तो परिसर सॅनीटायझ केलेला नाही. विशेष म्हणजे, कुटुंबाला एका पंचतारांकित हॉटेलात क्वारटाईन होण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत असून, मोठयांना सूट देत असल्याचे बोलले जात आहे. कडक शिस्तीच्या महिला जिल्हाधिकारी देखील यावर शांत असल्याने नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

बडया व्यापार्‍याच्या घरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांना बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळाली नाही किंवा कळू दिली नाही. आता घरातील 10 दे 12 सदस्यांचे आज नमुने घेण्यात आले आहेत. पण त्यांना एका पंचतारांकित हॉटेलात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन त्यांना इतकी सूट का देत आहे, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. तर त्यांच्या संपर्कात असलेल्या दुसऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना देखील तपासले गेलेले नाही. किंवा त्यांना क्वारटाईन केलेले नाही. या महिलेसोबतच त्यांची नातेवाईक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ती देखील या कुटुंबासोबत काही दिवस राहिली असल्याचे सांगण्यात येते, तशी चर्चा परिसरात सुरू आहे.

कुणालाच भय नाही…
उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन होता. एकही रुग्ण नसल्याने नागरिक आनंदी होते. तर त्याचे श्रेय कडक शिस्तीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व पोलीस विभागाला दिले गेले आणि द्यायला देखील हवेच. पण गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. त्यातही कळंब शहर, तालुका व कोरोनामुक्त होता. पण शहरात 15 दिवसात दुसरा रुग्ण आढळला आहे. यामुळे कळंबकर चिंतेत पडले आहेत. ही साखळी तोडणे आजच्या परिस्थितीत प्रशासनाला शक्य आहे. पण त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेले सर्वांचे नमुने चेक करण्याची गरज आहे. मात्र तसे होत नसल्याची सुत्रांची माहिती आहे.