Coronavirus : अंबाजोगाईत कोरोनाचा हाहाकार ! 2 दिवसात 24 जणांचा मृत्यू

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन –  बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची आकडेवारीही चिंतेत भर टाकणारी आहे. शुक्रवार आणि शनिवार प्रत्येकी 12 असे दोन दिवसात 24 मृतदेहावर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दररोज 1 हजारापेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. शनिवारी तर जिल्ह्यात विक्रमी 1 हजार 211 रुग्ण आढळले आहेत. 337 एकट्या अंबाजोगाई तालु्क्यातील आहेत. शेजारच्या तालुक्यातून देखील रुग्ण अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी 1 हजारापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर मृतांची संख्याही मोठी आहे. दरम्यान अंबाजोगाईतील या दोन्ही रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृतदेह हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी होते.