कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यासह कुटुंबातील 8 जणांना ‘कोरोना’ची लागण, मुलगा व्हेंटिलेटरवर

बंगळूरूः पोलीसनामा ऑनलाईन – कर्नाटका(karnataka) चे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच त्यांचे सुपुत्र डॉ. गोपाल करजोल यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते गेल्या 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. करजोल यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

करजोल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, माझे पुत्र डॉ. गोपाल करजोल हे गेल्या 23 दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे व्हेंटिलेटरवर आहेत. मी कोरोना विषाणूच्या संसर्गातून सावरल्यानंतर हल्लीच माझी पत्नी घरी आली. मी स्वतः 19 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर कोरोनामुक्त झालो. आतापर्यंत माझ्या कुटुंबातील आठ सदस्य कोरोनाबाधीत झाले आहेत. 21 आणि 26 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या विधानसभेच्या अधिवशनादरम्यान करजोल यांना कोरोना झाला होता.

करजोल हे बागलकोट आणि कलबर्गी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री आहेत. तसेच ते बागलकोट जिल्ह्यातील मुढोल मतदारसंघाचे आमदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. दोन्ही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपण अक्षम असल्याचे त्यांनी म्हणले आहे. लांब पल्ल्याचा आणि शारिरीकदृष्ट्या थकवणारा प्रवास करण्यास डॉक्टरांनी मला मज्जाव केला आहे.

त्यामुळे पूरग्रस्त भागाचा मी दौरा करत आहे. असे असले तरी मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात सातत्याने आहे. तसेच तेथील परीस्थितीवर नजर ठेवून आहे. कर्नाटकात जुनपासून कोरोनाचा फैलाव वाढला आहे.राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.