Coronavirus : ‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर दात पडू लागल्यानं डॉक्टरांसह इतर जण देखील ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कारण, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. अमेरिका, ब्रिटन सरकारनं लसीकरणास परवानगी दिली आहे.

‘न्यूयॉर्क टाईम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार, माणसाच्या फुफ्फुसांवर थेट हल्ला चढवणाऱ्या कोरोनानं आता दातांवर आक्रमण केलं आहे. काही कोरोना बाधितांचे दात कमजोर होत असून ते पडत आहे. याशिवाय कोरोनावर मात केलेल्या न्यूयॉर्कमधील काही जणांना केसगळतीचा त्रास होऊ लागला आहे. काहींच्या पायांची बोटं सुजली आहेत. दरम्यान, एखाद्या व्यक्तीचा दात अचानक पडणं अतिशय आश्चर्यजनक असल्याचं मत उटाह विद्यापीठातील पीरियडॉन्टिक्स डॉ. डेव्हिड ओकानो यांनी व्यक्त केलं. ही समस्या पुढे आणखी गंभीर स्वरुप धारण करू शकते, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

जाणून घ्या ही संपूर्ण घटना
न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेल्या ४३ वर्षीय फराह खेमिली यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या पूर्ण बऱ्या झाल्या. मात्र एके दिवशी त्यांना दातांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी दातांना हात लावून पाहिला. त्यावेळी एक दात हलत असल्याचं लक्षात आलं. दुसऱ्याच दिवशी फराह यांचा दात पडला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे दात पडताना त्यांना कोणतीही वेदना जाणवली नाही आणि रक्तस्रावदेखील झाला नाही. या घटनेनंतर संशोधकांनी यावर संशोधन सुरू केलं. मात्र कोरोना विषाणूचा परिणाम दातांवर होतो, असं मत काही दंतचिकित्सकांनी व्यक्त केलं. मात्र त्यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नाही. कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम दातांवर होतो, अशी कोणतीही बाब अद्याप तरी संशोधनातून समोर आलेली नाही, असं संशोधकांनी सांगितलं.