कचऱ्याच्या गाडीतून व्हेंटिलेटरची वाहतूक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरात : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच सुरत जिल्ह्यामध्ये चक्क कचरा वाहतूक करणा-या ट्रकमधून 34 व्हेंटिलेटर रुग्णालयात नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्यातील रुग्णांलयात व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत असल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सुरतला 34 व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता. वलसाडचे जिल्हाधिकारी आर. आर. रावल यांनी सूरत महापालिकेने पाठवलेल्या वाहनातून व्हेंटिलेटरची वाहतूक झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे सांगितले आहे. आता याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरातमध्ये सोमवारी 24 तासांत पहिल्यांदाच 3 हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडत 3160 रुग्णांची नोंद झाली. यासोबत गुजरातमधील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 3 लाख 21 हजार 598 झाली आहे. तर एकूण 4581 जणांचा मृत्यू झाला आहे.