Coronavirus : काय सांगता ! होय, रायगडमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ, दुबईहून आलेले क्रिकेटर थेट घरी

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रायगडमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ पहायला मिळाला आहे. दुबईतील शारजाहमध्ये 10PL वर्ल्डकप टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड आणि पनवेलच्या संघांनीही सहभाग घेतला होता. या खेळाडूंना कोरोना संशयित म्हणून 14 दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार होते. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे सर्व खेळाडू घरी निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.

दुबईत गेलेले सर्व 18 खेळाडू आज सकाळी मुंबईत परतले. त्यांना पनवेल महापालिकेने खास बस करून रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर या सर्व खेळाडूंना खारघर येथील ग्रामविकास भवनामध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, डॉक्टरांनी केवळ तीन जणांना थांबवून अन्य 15 जणांना घरी सोडून दिले. यामुळे ठेवायचे असेल तर सर्वांनाच ठेवा नाही तर आम्हीही जातो, असा पवित्रा या खेळाडूंनी घेला आहे.

यावेळी पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. मात्र हे खेळाडू थेट घरी निघून गेल्याने पोलिसांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी तातडीने बैठक बोलावली असू यामध्ये पुन्हा या खेळाडूंना निरीक्षणासाठी आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एककीडे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना आखत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे सामान्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.