Lockdown : आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला 1100 KM चा ‘खडतर’ प्रवास

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांप्रमाणे अनेकांना अडथळयांचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगड सशस्त्र बल (सीएएफ) मध्ये तैनात असलेला जवान 1 हजार 100 किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास करुन आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आणि जवान कर्तव्य चोख बजावत आहेत, तर दुसर्‍या बाजूला कौटुंबिक जबाबदार्‍याही निभावत आहेत. छत्तीसगडमधल्या बीजापूरमधून उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला तब्बल तीन दिवस लागले. मूळचे उत्तर प्रदेश मिर्जापूरचे असणारे संतोष यादव (30) छत्तीसगड सीएएफमध्ये नोकरीला आहेत. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर संतोष पायी चालत निघाले.

त्यानंतर मालगाडी आणि नाव असा तब्बल 1 हजार 100 किलोमीटरचा खडतर प्रवास करुन ते सीकर या मूळगावी पोहोचले. चार एप्रिलला संतोष यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली. दुसर्‍याच दिवशी वाराणसीमधील एका रुग्णालयात संतोष यांच्या आईचा मृत्यू झाला.सात एप्रिलला संतोष सकाळी गावी जाण्यासाठी पायी चालत निघाले होते. आईच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर काहीही करुन मला माझ्या गावी पोहोचायचे होते. माझा छोटा भाऊ आणि बहिण दोघे मुंबईमध्ये राहतात. लॉकडाउनमुळे गावी पोहोचणे त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत मी माझ्या वडिलांना एकटे सोडू शकत नव्हतो असे संतोष यांनी सांगितले.