Coronavirus : 24 तासामध्ये ‘कोरोना’मुळं देशात 47 जणांचा मृत्यू, 1975 नवे रूग्ण ! आतापर्यंत सुमारे 27000 बाधित तर 826 मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतातील परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या 26,917 वर पोहोचली आहे. रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात कोरोना संसर्गामुळे 826 लोकांचे मृत्यू झाले असून एकूण 20,177 लोकांना सध्या साथीच्या आजाराची लागण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1975 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर या विषाणूमुळे 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 594 लोकांनी या विषाणूंवर यशस्वीरीत्या मात केली असून आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 5914 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
रविवारी (26 एप्रिल) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशातील 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाला आहे. कोविड – 19 पासून सर्वाधिक त्रस्त झालेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत 323 लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच मध्य प्रदेशात 99, गुजरातमध्ये 133 आणि उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे 29 आणि 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. “कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रातच 7628 आढळले आहेत. त्यांनतर गुजरातमध्ये 3071, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीमध्ये 2625 प्रकरणांची नोंद झाली आहे.

त्याचवेळी कॉंग्रेसने म्हटले आहे की, जगातील कोरोना साथीचा लढा देण्याचा अनुभव सांगत आहे की ,या विषाणूचा सामना चाचणीद्वारेच केला जाऊ शकतो, परंतु आपल्याकडे पुरेशी क्षमता असूनही, साथीच्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी सरकार त्याचा पूर्ण उपयोग करत नाही. कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी रविवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाशी सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चाचणी आहे, परंतु दुर्दैवाने आमच्याकडे कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आल्यापासून आतापर्यंत केवळ पाच लाख 80 हजार लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात चाचणीचे प्रमाणही शेजारच्या देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

ते पुढे म्हणाले की, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताची दररोजची कोरोनाची चाचणी क्षमता एक लाख आहे, परंतु आश्चर्य म्हणजे सरकार या क्षमतेचा पूर्ण उपयोग करीत नाही. सरकारने उत्तर द्यावे की जेव्हा दररोज एक लाख लोकांची चाचणी करण्याची क्षमता आहे, तर दररोज केवळ 39 हजार चाचण्या का केल्या जात आहेत. सरकारने हेही सांगायला हवे की सरकारने आपली क्षमता मर्यादित केली असेल तर त्यामागील काही विचारशील रणनिती आहे का?