Coronavirus : ‘कोरोना’ किती टक्के लोकांचे प्राण घेतो, कशामुळं बनलंय रहस्य ?
पोलिसनामा ऑनलाईन : सध्या कोरोनाने जगभरात कहर केला आहे. दररोज लाखोंच्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूमुळे जगात आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त भारताचा विचार केला तर, देशात 96 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु आतापर्यंत जगभरात कोरोना किती टक्के लोकांचे जीव घेतेय याचा शोध लागला नाही. यात तज्ज्ञही मोठे गोंधळून गेले आहेत.
रॉयटर्सया वृत्तसंस्थेनुसार, जगभरातील तज्ञ अद्याप कोरोना विषाणूच्या मृत्यूचे प्रमाण किती आहे यावर संशोधन करत आहेत. सध्या मृत्यू दर प्रत्येक देशानुसार वेगवेगळा आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीही काळानुसार बदलत आहे. यामुळे तज्ज्ञही चिंतेत आहेत.
कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कसा मोजला जातो-
प्रत्यक्ष मृत्यूची संख्या केवळ संक्रमित लोकांच्या एकूण संख्येच्या आधारे मोजली जाऊ शकते. परंतु कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या संशयास्पद राहिली आहे, कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना संसर्ग झालेला आहे परंतु त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. यामुळे अशा बऱ्याच जणांची कोरोना रुग्ण म्हणूनही नोंद होऊ शकली नाही.
सध्या जगात एकूण कोरोना संक्रमण झालेल्यांची संख्या 30 दशलक्ष आहे, परंतु प्रत्यक्षात संक्रमित लोक त्यापेक्षा जास्त असतील जे मोजता येत नाहीत, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. तज्ञांचे मते, जगभरात कोरोना संक्रमित लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 0.5 ते 1 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो.
अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे डॉ. क्रिस्तोफर मरे म्हणतात की 20 वर्षांखालील लोकांमध्ये कोरोनाचा मृत्युदर प्रति 10 हजार रुग्णांच्या मागे 1 आहे. तर 85 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये मृत्युदर 6 एवढा आहे. कोरोनाचा प्रसार अनेक देशांमध्ये वाढत आहे आणि संक्रमित लोक मोठ्या संख्येने वाढत आहेत, तर दुसऱ्याबाजूला मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.