Coronaviurs : रात्री 2 वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी मशीद रिकामी करायचं ‘मिशन’ केलं पुर्ण

पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांनी दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला होता. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास सांगितले. त्यानुसार अजित डोवाल 28-29 मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मर्कझमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मौलाना साद यांची मनधरणी करत मशिदीमधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यासाठी आणि क्वारंटाइन करण्यासाठी तयार केले.

तेलंगणमधील करिमनगर येथील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित शाह आणि अजित डोवाल यांना निजामुद्दीन येथील परिस्थितीची कल्पना आली होती. सुरक्षा यंत्रणांनी यानंतर दुसर्‍याच दिवशी सर्व राज्यांच्या पोलिसांना यासंबंधी अलर्ट पाठवला होता. अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मर्कझकडून 167 तबलिगी कर्मचार्‍यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. अजित डोवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. देशाचं धोरण ठरवताना अनेकदा अजित डोवाल या संघटनांशी चर्चाही करतात. सुरक्षा अधिकारी सध्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची वैद्यकीय चाचणी होईल याची काळजी घेत आहेत.या कार्यक्रमात एकूण 216 परदेशी नागरिक उपस्थित होते.