पुण्यातील ‘त्या’ खासगी हॉस्पीटलवर कारवाई करण्यासाठी अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरली उपचारात हालगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयाशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.6) दिला.

पुण्यातील विधान भवनातील झुंबर हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अर्थचक्राला गती देणे आवश्यक
या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपयांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बिस्सत दिसते. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करण्याच निर्देश त्यांनी दिले.

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे
लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना भरारी देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवन सुरळीत करणे गरजेचे आहे. तसेच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरु करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे. याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरच घेऊ
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. मुलांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील.