Coronavirus : ‘केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर दुर्दैवी’, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : देशात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक आकडा समोर येत आहे. राज्यात संक्रमितांचा आकडा २ हजाराच्या पुढे गेला असताना आता आणखी एक मोठं आव्हान राज्य सरकारसमोर उभं राहिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊनची ऐशीतैशी करत परराज्यातील हजारो कामगार मुंब्रा आणि वांद्रे परिसरात रस्त्यावर उतरलेले दिसले. आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी या मजुरांनी बस स्थानकावर गर्दी केल्याचे समजते. मात्र, आता या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वांद्रयात रोजंदारीवर काम करणारे हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहे आणि ही बाबत आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकार काही उपाय करायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1250052638219083776

फडणवीस पुढे म्हणाले कि, ‘आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा, जेणेकरून पुढे अश्या घटना होणार नाहीत. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखीनच दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही कळकळीची विनंती.’ दरम्यान, मुंब्रानंतर वांद्रे बस डेपो परिसरातील रोजंदारीवर काम करणारे हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते. आम्हाला अन्न – पाणी नको आहे, आम्हाला आमच्या मुळगावी जाऊ द्या अशी मागणी या मजुरांनी लावून धरली आहे. अखेर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार ३ मेपर्यंत हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण आता यावरुनही राजकारण सुरु झालं आहे. युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ज्या दिवशी गाड्या बंद केल्या आहेत त्या दिवसापासून, प्रवासी कामगार घरी परत जावेत यासाठी राज्याने २४ तासासाठी गाड्या धावण्याची विनंती केली होती पण केंद्रान दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्यावरुन भाजपाने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत आरोप केले आहे.