फडणवीसांचे शिवसेनेचे आमदार गायकवाडांना चोख उत्तर, म्हणाले – ‘तळीरामांना कोरोना लवकर होतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने कहर केला आहे. बिकट अवस्था असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आता या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, रात्रीची उतरली नसताना संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली असावी. माझी त्यांना एक विनंती आहे कि त्यांनी माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लव्हज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. मला जनतेचे आशीर्वाद असल्याने मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो,’’ असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा आहे.

त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. अशातच शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका करताना पटली सोडली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं गायकवाड म्हणाले होते. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत कोरोनामुळे ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे.