बँकेतील कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय, परळीत ‘कर्फ्यू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात आता अनलॉक- २ सुरु झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये हळूहळू शिथिलता मिळत आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आणि ग्रामीण भागात नागरिकांचे येणे-जाणे सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. आता परळीतील स्टेस्ट बँकेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही लोकांना या संसर्गाची बाधा झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

धनंजय मुंडे यांनी फेसुबक पोस्ट द्वारे म्हटलं आहे की, ‘स्टेट बँकेतील काही कर्मचारी कोरोना संसर्गित असल्याचं कळले. घाबरण्याचे काही कारण नाही मात्र दक्षता म्हणून आपण परळी शहरात पुढील ८ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करत आहोत. तसेच काही गावांमध्ये आवश्यकतेनुसार कंटेंटमेंट झोन लागू करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहे.

‘आरोग्य विभागामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आपण राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या कमर्चाऱ्यांच्या संपर्कात आले असल्याचं, किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास त्याची माहिती स्वतःहून प्रशासनास द्या, तपासणी करुन घ्या. कोरोनाविरोधात लढून आपल्याला ही साखळी तोडायची आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा. मी सातत्याने यंत्रणेच्या संपर्कात आहे. घाबरुन जाण्याचं काहीही कारण नाही, सर्वानी काळजी घ्या, सतर्क रहा’ असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात आतापर्यंत १५१ कोरोना संसर्गित रुग्ण सापडले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. तर ३२ रुग्णांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.