‘धनंजय मुंडे फायटर आहेत, ते लवकरच ‘कमबॅक’ करतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना श्वसनाचा किरकोळ त्रास आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. तरीही खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. मुंडे हे फायटर आहेत. ते लवकरच बरे होतील, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसार पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं असून तयारी पूर्ण झाली आहे. ते फायटर असून पुन्हा एकदा सक्रीय होतील असे राजेश टोपे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पण अजित पवारांच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. मंत्रिमंडळाची लोक सुरेक्षेच्या अंतरावर होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रमही पाच मिनिटांचा होता. कोणतंही भाषण देण्यात आलं नाही. ध्वजारोहण करताना फक्त पाच लोक उपस्थित होते. कोणालाही कोरोनाची लक्षणं जाणवलेली नाहीत. आयसीएमआरच्या गाईडलाईनप्रमाणे लक्षणं नसतील तर चाचणी करण्याची विषय येऊ शकत नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद भूषवणारे धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री समोर आलं. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर कोरोना पॉजिटिव्ह आढळून आलेले धनंजय मुंडे हे ठाकरे सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील बहुतेक जण क्वारंटाईन झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी पत्रकारांना मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती दिली.