Coronavirus : दुर्देवी ! डॉक्टर मुलीनेच नाकारला वडिलांचा मृतदेह, त्यानंतर असे झाले अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. त्यात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पीएम मोदींनी केले आहे. मंगळवारी ३५४ नवीन प्रकरणे समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. आतापर्यंत ११४ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या संकटात अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे, तर दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही घडत आहेत.

या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त होते. तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांना मधुमेह, हृदय विकार आणि हायपरटेन्शन यासारखे आजार देखील होते. तर एकीकडे या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्य संस्काराबाबत अडचणी येत आहेत. पंजाबच्या अमृतसर येथील एका कुटुंबाने स्वतःच्या कुटुंबातील सदस्याचा मृतदेह घेण्यास नाकारले आहे. ही व्यक्ती निगम सुपरिटेंडेन्ट होती. कुटुंबाने मृतदेह घेण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी शिवदुलार सिंह ढिल्लो यांनी जसविंदर सिंह यांच्या अंत्य संस्काराची जबाबदारी प्रशासनाकडे दिली. एसडीएम विकास हिरा, एसपी जसप्रीत सिंह, तहसीलदार अर्चना आणि एचएसओ गुरुन्द्र सिंह यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारी स्वीकारली.

गुरुद्वारा श्री शहीदा साहिबाजवळ असलेल्या एका स्मशानभूमीत शीख धर्म परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले गेले. यात विशेष म्हणजे पटवारी आणि निगम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला तर तहसीलदार अर्चना यांनी अंतिम अरदाससाठी ग्रंथी प्रबंध केला. विकास हिरा यांनी सांगितले की, आम्ही मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क केला होता, पण कुटुंबाने पार्थिव शरीर घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे मृत व्यक्तीची मुलगी डॉक्टर असतानाही तिने वडिलांचे पार्थिव घेण्यास नकार दिला.