देशातील डॉक्टरांची PM मोदींकडे तक्रार, ‘व्हीआयपी कल्चर हद्दपार करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशावर पुन्हा एकदा कोरोनाची आपत्ती ओढावली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. अशा संकट काळात राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना राजकीय नेत्यांकडून व्हीआयपी कल्चरचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात डॉक्टरांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने (FAIMA) थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.

फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने मोदींना पत्र पाठवले आहे. या पत्रात डॉक्टरांनी राजकीय नेत्यांच्या व्हीआयपी कल्चरची तक्रार केली आहे. राजकीय नेत्यांकडून व्हीआयपी कल्चरचं दर्शन घडत असून, शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना राजकारण्यांकडून चाचण्या आणि उपचारासाठी घरी बोलावून घेतले जात आहे, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

कोरोना काळात पहिल्या फळीत सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना विषाणूचा संसर्ग झाला, तर अल्पशी सुविधा मिळते. तर दुसरीकडे रॅली आयोजित करणाऱ्या आणि विषाणूचा प्रसार करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वरचा प्राधान्यक्रम दिला जात आहे. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्हीआयपी काऊंटर्स आहेत. तिथे फक्त राजकीय नत्यांच्या आणि मंत्र्यांच्याच्या कोविड चाचण्या केल्या जातात. पण अशा ठिकाणी डॉक्टरांसाठी स्वतंत्र काउंटर्स नाहीत, अशी तक्रार पत्रातून केली आहे.

वैद्यकीय अधीक्षकांसाठी कोणतेही आदेश नसताना राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना चाचण्या आणि उपचारासाठी त्यांच्या घरी बोलावलं जात आहे. या संकट काळात डॉक्टर स्वत: चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु त्या मोबदल्यात त्यांना काय मिळत आहे, तर चाचण्यांसाठी लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना बेड आणि आयसीयूही उपलब्ध होत नाही, अशी तक्रार फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान मोदींकडे केली आहे. यावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेश बगाडी, उपाध्यक्ष डॉ. अमरनाथ यादव आणि महासचिव डॉ. सुब्रांकर दत्ता यांच्या सह्या आहेत.