Coronavirus : ‘या’ कारणामुळं भाजपा आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला नाही दिलं !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  –   चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. देशातही हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही अतोनात प्रयत्न करत आहे. सत्ताधारी पक्षांबरोबरच विरोधी पक्षसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आपण आता कोरोनाच्या धोकादायक पातळीवर आहोत. अजूनही कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. पण आपण थोड्या चुका केल्यास कम्युनिटी स्प्रेडकडे जाऊ शकतो, अशा प्रकारची अवस्था असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

तसेच यावेळी फडणवीस यांना सीएम फंडाला मदत न केल्याची विचारणा केली असता ते म्हणाले कि, पीएम फंड आणि सीएम फंड असा कोणताही भेद या ठिकाणी नाही. आमच्या आमदारांचे पैसे आम्ही भाजपा आपदा निधीला दिले आहेत. ज्या वेळी तीन जिल्ह्यामध्ये पूर आला, त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं स्वतंत्रपणे आपले निधी तयार करून लोकांची मदत केली. तसेच आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवल्यानंतर शिवसेनेनं एक वेगळं अकाऊंट उघडून शिवजल योजना तयार केली. सरकारमध्ये असूनदेखील त्यांनी सीएम फंडाला पैसे दिले नाहीत. शेवटी जनतेची कामच आपण करतो आहोत. जर कोणाला सीएम फंडाला मदत करायची असल्यास त्यांनी जरूर करावी, दरम्यान, आतापर्यंत जे पॅकेजेस आले, ते सर्व केंद्र सरकारनं दिलेत. राज्य सरकारनं अजून एकही पॅकेज दिलेलं नाही. प्रत्येकाचा भार केंद्राच्या तिजोरीवर पडणार आहे. केंद्राकडेही पैशाचं झाड नाही आणि राज्य सरकारकडेही पैशांचं झाड नाही. त्यामुळे असा कुठल्या प्रकारचा भेदभाव नसल्याचं यावेळी त्यांनी म्हंटल आहे.

पंतप्रधानांचा निधी आहे, मुख्यमंत्र्यांचा निधी आहे, आमचाही निधी आहे आणि स्वयंसेवी संस्थांचाही निधी आहे. त्यामुळे जनतेनं जिथे चांगलं काम सुरू आहे, तिथे मदत करावी. आमच्या आमदारांच्या किंवा आपदा निधीच्या माध्यमातून अन्नधान्य जमा करून महाराष्ट्रातल्याच लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कोरोना आपदा कोष तयार केला आहे. ज्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात सेवा चालवतो आहोत. आमच्या आमदारांचे पगार आम्ही दिलेले आहेत. त्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आम्ही आतापर्यंत अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. ५२ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचायचं असल्यास आम्हालाही स्त्रोताची गरज आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपण हा स्प्रेड होण्यापासून वाचवू शकलो. इटली, स्पेन आणि अमेरिकेत ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरस पसरला आहे, तेवढा भारतात पसरलेला नाही. कोरोनापासून बचाव करण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे. घराबाहेर न पडता, आयसोलेशनमध्ये राहूनच आपण कोरोनाला रोखू शकतो. आपला भारत देश एक टीम असून, एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.