Coronavirus : अखेर CM ठाकरेंनी ‘मौन’ सोडलं, नाव न घेता ‘भाजप’ नेत्यांचा घेतला ‘समाचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे संकट असताना जितेंद्र आव्हाड आणि वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची मिळालेली परवानगी या मुद्यावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याच मुद्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची तयार केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही विरोधक निशाणा साधत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे नाव न घेता टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीबाबत उलटसुलट बातम्या येण्याऐवजी थेट मुख्यमंत्री म्हणून जनतेशी संवाद साधणे मला योग्य वाटलं. देशभरात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. पण प्रत्येकजण राजकारण बाजूला ठेऊन या संकटाशी सामना करत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन काम करत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. त्यामुळे यात वितुष्ट नको, पक्षीय राजकारण थांबले पाहिजे. राजकारण आपल्या पाचवीला पुजले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवा असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

भारत महासत्ता बनेल
तसेच आजच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मुख्यमंत्र्यांनी तोंडावर मास्क लावलेले होते. हे चित्र विचित्र होतं. आजपर्यंत कोणीही आमच्या तोंडावर पट्ट्या बांधल्या नव्हत्या. आमचं तोंड बंद करण्याची हिंमत केली नाही पण एका विषाणूने आज हे चित्र पहायला मिळालं. आम्ही सुद्धा जबाबदारी घेत आहोत. या वातावरणात राजकारण करू नका, प्रत्येकाने एकजूट कायम ठेवली तर आपला देश कोरोनाच्या संकटावर मात करेल पण भारत हा जगातील महासत्ता देश बनले असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं
मुख्यमंत्री म्हणाले, 14 एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र धैर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने करायचे आहे. हा लाकडाऊन कधीपर्यंत संपेल हे जनतेच्या हातात आहे. आपण कोरोनाचा साखळदंड तोडला तर हे लवकरच संपेल. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील मात्र शेतीच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले