Coronavirus : अमेरिकेत कोल्हापूरचा मराठमोळा संशोधक शोधतोय ‘कोरोना’वर लस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे तर हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या रोगावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. चीन, इटली या ठिकाणी कोरोना व्हायरसचे प्रमाण अधिक असून अमेरिकेत देखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरसचे 175 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. चीन, अमेरिका या देशांकडून कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेच्या सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये एक पथक कोरोनावर लस शोधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या पथकाचे नेतृत्व एक मराठी माणूस करत आहे.

कोल्हापूरातील संशोधक जय शेंडुरे यांनी कोरोनावर लस शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. यापूर्वी त्यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचं संशोधन केलं होतं. त्याला गर्भाची डीएनए ब्लू प्रिंट म्हणून 2012 मध्ये विकसित करण्यात आली आहे. शेंडुरे कुटुंब मागील अनेक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. ते सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. त्यामुळे या सेंटरच्या माध्यमातून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी बनवलेल्या औषधावर चाचणी घेण्याचं काम सुरु आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोनावर मात करणं शक्य होणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जय शेंडुरे म्हणाले की, सध्या जगभरात कोरोनाचा अभूतपूर्व फैलाव झाला आहे. अनेक जण या व्हायरसच्या कचाट्यात सापडले असून 9 हजारापेक्षा अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये जीव वाचवण्यासाठी वेगाने हालचाली करण्याची आवश्यकता आहे. कोरोना संकट दूर करण्यासाठी लवकरच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.