Coronavirus : वानरांवर प्रभावी ठरले ‘हे’ औषध, आता ‘कोरोना’ रूग्णांवर केली जातेय ‘चाचणी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ त्यावर लस तयार करण्यात गुंतले आहेत तर दुसरीकडे त्याचे औषध तयार करण्यासाठीही संशोधन चालू आहे. सध्या आधीच उपलब्ध औषधांच्या जोरावर कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनासाठी अनेक औषधांची क्लिनिकल चाचणी सुरू आहे. जर ही औषधे चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली तर कोरोना युद्धामध्ये मोठी आशा असल्याचे सिद्ध होईल. अमेरिकन संशोधकांना एका औषधामध्ये असाच एक आशेचा किरण दिसून आला आहे. हे औषध वानरांच्या प्रयोगादरम्यान कोरोनाशी लढण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. आता त्याची चाचणी कोरोना रूग्णांवर सुरू आहे.

एका नवीन अभ्यासानुसार आढळले की, अँटीवायरल औषध ‘रेमेडीसीव्हीर’ कोविड 19 ने संक्रमित वानरांमधील विषाणूंची संख्या कमी करते आणि त्यांना फुफ्फुसाशी संबंधित त्रास किंवा आजार होऊ देत नाही. या औषधाची तपासणी आता कोरोना संक्रमित रूग्णांवर केली जात आहे. मंगळवारी ‘नेचर’ या आरोग्यविषयक जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, रेमेडीसीव्हीर औषधाने कोरोनाव्हायरसच्या रूग्णांच्या सुरुवातीच्या उपचारात न्यूमोनिया होत नाही. अलीकडील अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी हा दावा केला आहे.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांना निष्पन्न झाले की, रेमेडीसीव्हीरची व्याप्ती विस्तृत आहे आणि प्राण्यांमध्ये सार्स-सीओव्ही आणि मार्स-सीओव्हीमध्ये संसर्ग रोखण्यासाठी ते खूप प्रभावी असल्याचे दिसते. संशोधक अ‍ॅमी डी विट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रीमाडेसिविरच्या प्रभावांचा वानरांच्या जुन्या प्रजातीवर अभ्यास केला. त्यांना आढळले की, ज्या वानरांना हे औषध देण्यात आले त्यांना श्वसन रोगाची लक्षणे आढळली नाहीत आणि त्यांच्या फुफ्फुसांनाही कमी नुकसान झाले आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांमध्ये या औषधाचा उपयोग केल्यास उपचार प्रभावी होऊ शकतात, असे संशोधकांनी सांगितले. यापूर्वी दक्षिण कोरियामध्येही कोरोना रूग्णांवर या औषधाचा वापर करण्यास परवानगी मिळाली आहे.