अन्नधान्य वाटपासाठी ‘ई-पास’ची अट मे महिन्यासाठी शिथील

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्यचे वाटप करतांना सुरु असलेली ई-पास प्रणाली मार्च-एप्रिल मध्ये शिथिल करण्यात आली होती. पण केंद्र सरकारच्या वतीने ई-पास प्रणाली पुन्हा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतु राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्याचे रेशन वाटप करतांना ई-पासची अट शिथिल करण्यात आली असून, अन्न धान्याची वाटप योग्य होण्यासाठी रेशन दुकानांमध्ये शिक्षक तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

रेशन दुकानांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत वाटप होत असलेल्या लाभार्थी व्यक्तीचा ई-पास मशीनवर अंगठा घेण्यात येतो. परंतु ई-पास मशीनवरती लाभार्थ्यांची अंगठा देतांना वाटप करणाऱ्या दुकानदारांचा जवळून संपर्क येतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते व डिस्टन्स पाळणे शक्य होत नसल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे धान्य घेण्याकरता येणाऱ्या शिधा पत्रिकाधारकांचा मशीनवरती अंगठा न घेता त्यांचा रेशनकार्ड नंबर घेण्याची मुभा रास्त भाव दुकानदारांना देण्यात आलीय.

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कायम असून परिणामी रेशन दुकानदार व लाभार्थी यांनी सदर प्रणालीचा वापर केल्यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने मे महिन्यात धान्य वाटप करतांना ई-पास प्रणाली अट शिथिल करण्याचा निर्णय राज्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागातून घेतला होता. तसंच रेशन धान्याचे वाटप करतांना शिक्षक किंवा अन्य कोणताही शासकीय कर्मचाऱ्याच्या मदतीने रेशन दुकानांमध्ये अन्न धान्याचे वाटप योग्य रीतीने होते की नाही याबाबत लक्ष ठेवण्यात येतयं. ज्या जिल्ह्यात अद्यापही स्वस्त धन्य दुकानांत शिक्षक किंवा कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नाही त्या जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या नेमणूक करून आपल्या जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये गैरव्यवहार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे आदेश देण्यात आले आहे. मे नंतर कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेऊन नंतर ई- पास चा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.