भाजपाच्या ठाकरे सरकारविरूध्दच्या आंदोलनाला नाथाभाऊंनी दिला ‘असा’ प्रतिसाद

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यातील ठाकरे सरकार कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपानं सरकारविरोधात ‘महाराष्ट्र वाचावा’ आंदोलन केलं. ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा नावानं झालेल्या या आंदोलनात राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, सध्या पक्षावरती नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य सरकाराच्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले.

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आपल्या कुटुंबीयांसह राज्यसरकार विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासमवेत सुनबाई खासदार रक्षाताई खडसे या देखील उपस्थित होत्या. ‘उद्धव अजब तुझे निष्फळ सरकार’ या आशयाचं फलक दाखवत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.

यासंदर्भातील ट्विट रक्षाताई खडसे यांनी केलं. त्यात महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच एकनाथ खडसे आज या आंदोलनात सहभागी झाल्याने पक्षावर नाराज असले तरी ते पक्षासोबत असल्याचे संकेत मिळाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांनी मुंबई भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना ठाकरे सरकारवरती जोरदार निशाणा साधला. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड सरकारने आर्थिक पॅकेज दिले. पण राज्यातील सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एका नवा रुपया खर्च करण्यास तयार नाही. केंद्राने २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं . केंद्र सरकारने ४६८ कोटी रुपये दिले. याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. मात्र, राज्य सरकारने एक दमडीचंही आर्थिक पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

राज्यातील सरकार आणि मंत्री आभासी दुनियेत जगत आहे. सोशल माध्यमात पेड गॅंग तयार करून आणि काहींना प्रवक्ते करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय. पण सध्या ग्राउंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे. रुग्णांना उपचार मिळत नाही, रस्त्यावर फिरावं लागत, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडलं. तसेच देशातील २० टक्के कोरोना संसर्गित रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.