Coronavirus Lockdown : संपूर्ण मध्य प्रदेशात ‘एस्मा’ कायदा लागू : CM शिवराज सिंह चौहान

भोपाळ : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सुरु असलेला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असतानाच मध्य प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात एस्मा अर्थात ‘अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा’ किंवा ‘जीवनावश्यक कायदा’ लागू केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून एस्मा कायदा लागू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात एस्मा कायदा लागू केल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खुद्द ट्विट करून याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये चौहान यांनी सांगितले की, नागरिकांच हित ध्यानात घेता योग्य व्यवस्थापनासाठी सरकारनं राज्यात तात्काळ एस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विटमध्य म्हटले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात आत्तापर्यंत 327 कोरोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 173 रुग्ण इंदोरमध्ये आढळले आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्ये 91 रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये 45 आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपत असला तरी राज्यात मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. गरज पडल्या लॉकडाऊन पुढेही काही दिवस सुरु राहिल परंतु परिस्थिती पाहून या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच भोपाळ आणि इंदोरमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

You might also like