Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’च्या नावानं अफवांचा बाजार ‘गरम’, विद्यापीठाला फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या कोरोना व्हायरसच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. चक्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देखील अशाच एका अफवेचा मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या नावानं बनावट पत्रक जारी करून कुणीतरी विद्यापीठ महाविद्यालयांना परस्पर सुट्टी जाहीर केल्याचं समोर आलं आहे. या घटनांवरून माध्यमांचा वापर करून सामाजाची दिशाभूल करणारे संदेशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतंय.

सध्या सोशल मीडियावर करोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे’ असा संदेश फिरत आहे. संबंधित निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले नाही. ते कोणीतरी खोडसाळपणे तयार केले आहे.

या प्रकारामुळे समाजात अफवा व घबराहट पसरण्याचा धोका आहे. ‘हा संदेश चुकीचा आहे याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं तात्काळ याबाबत खुलासा करून अफवेचं खंडन केलं आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करणात येणार आहे, असा इशाराही विद्यापीठ प्रशासनानं दिला आहे.