नवी मुंबई : कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणारे 2 लॅब चालक ‘गोत्यात’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना चाचणीचे नमुने घेऊन कामगारांना बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघा लॅब चालकांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीनी रबाळे एमआयडीसीतील एका कंपनीच्या 133 कामगारांना बनावट रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे. या दोघांनी इतरही अनेकांना बनावट निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याची शक्यता आहे.

देविदास घुले (रा. ठाणे) आणि महमद वसीम अस्लम शेख (रा. कल्याण) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घुले हा ठाण्यातील मिडटाऊन डायग्नोस्टिक लॅबचा मालक आहे. तर शेख हा कल्याण येथील परफेक्ट हेल्थ केअरचा मालक आहे. या दोघांनाही न्यायालयाने 19 एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबाळे एमआयडीसीतील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीने कामगारांची कोरोना चाचणी घेण्यासाठी 8 एप्रिल रोजी कंपनीत शिबीर भरवले होते. यासाठी त्यांनी देविदास घुले याला कळविले होते. यानुसार घुले यांने शेख याच्या मदतीने हा कॅम्प घेतला होता. शेख याला थायरोकेअर लॅबने कोरोना चाचणीचे नमुने जमा करण्यासाठी नेमले आहे. त्यानुसार 133 कामगारांचे नमुने थायरोकेअर लॅबमध्ये चाचणीला पाठवणार असल्याचे शेख यांने सांगितले. आरोपीनी प्रती कामगार 650 रुपये प्रमाणे कंपनीकडून 86 हजार 450 रुपये घेतले होते. मात्र कामगारांचे नमुने थायरो केअरमध्ये न पाठवता शेख याने स्वतः संगणकावर बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून ते कंपनीला दिले. मात्र सर्वच कामगारांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने व सर्वांवर एकच क्यू आर कोड असल्याने कंपनीला संशय आला. त्यामुळे कंपनीने थायरोकेअर लॅबमध्ये चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे थायरो केअर लॅबने पोलीसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीसांनी गुरुवारी दुपारी ठाणे व कल्याण येथून दोन्ही आरोपीना अटक केली. या जोडीने बनावट कोरोना रिपोर्ट देऊन कंपनीची, थायरो केअरची फसवणूक केली आहे.