धक्कादायक ! ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे अनेक घटना घडल्या आहेत. अशातच एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेळगावमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी आयसीयूमधील डॉक्टरांशी गैरवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. रुग्णवाहिकेला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला असून यावेळी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
बीआयएमएस रुग्णालयाबाहेर हा सगळा प्रकार घडला. रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी कोरोना वॉर्डसमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लावली. त्यानंतर पोलिसांच्या आणि इतर गाड्यांवर दगडफेक केली. या वेळी काही जणांनी आयसीयूमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवले. रुग्णवाहिका जळून खाक झाली असून सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त त्यागराज यांच्यासहित अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.