Coronavirus Death : ‘कोरोना’मुळं एकाच दिवसात 1000 जणांचा बळी, इटलीमध्ये मृत्यूचा दर एवढा जास्त का ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. या साथीच्या आजाराने इटलीला विध्वंस केले आहे. येथे मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आतापर्यंत 9 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. शुक्रवारी येथे कोरोना विषाणूमुळे सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला. इटलीतील मृत्यूचा आकडा जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना आश्चर्यचकित करणारा आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे कि, लोक आपल्या प्रियजणांना अंतिम वेळी भेटू देखील शकत नाही.

इटलीमधील मिलानमधील सॅको हॉस्पिटलचे डॉ. मास्सीमो गली म्हणाले की, इटलीच्या मुख्य शहरांमध्ये संक्रमित लोकांची आकडेवारी अत्यंत भयानक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे देशातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोक राहत असलेल्या या मुख्य शहरांच्या आसपासच्या भागातील लोकांचा यात समावेश नाही. त्यांनी सांगितले की, जेव्हा या संसर्गाने इटलीमध्ये एक भयंकर रूप धारण केले तेव्हा कुठे मोठ्या शहरांमध्ये लॅब बांधल्या गेल्या आणि त्या चाचण्या सुरू झाल्या. परंतु अजूनही लहान जागांवर आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत.

दरम्यान, इटली उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांसाठी देखील ओळखले जाते. रोम येथे कोरोना विषाणूची पहिली घटना 31 जानेवारी रोजी उघडकीस आली. परंतु देशात 10 मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, लोकांनी तेदेखील गांभीर्याने घेतले नाही, आणि शहरांमध्ये खरेदी चालूच ठेवली. रेस्टॉरंट्स, बार आणि क्लबमध्ये कुटुंबासह जेवण, लेटनाइट पार्टी करणे, बाजारात फिरणे. याचा परिणाम म्हणून, या विषाणूचा संसर्ग होणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.

वेगाने वाढणारा मृत्यूदर:

अहवालानुसार इटलीमध्ये एकूण मृत्यूंपेक्षा 9 टक्क्यांहून अधिक मृत्यूचे प्रमाण आहे. याउलट चीनमध्ये जिथे हे थैमान सुरु झाले. तेथे मृत्यूचे प्रमाण 3.8 टक्के आहे. जर्मनीमध्ये ते 0.3 टक्के आहे. तसेच संपूर्ण युरोपमध्ये कोरोना विषाणूची 3 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. एकट्या इटलीबद्दल कोरोना विषाणूची 86 हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद आहेत. येथे गुरुवारी 712 जणांचा मृत्यू, बुधवारी 683, मंगळवारी 743 आणि सोमवारी 602 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला.

जगभरात वाढतोय आकडा :

जगभरात एकूण 5,66,269 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 26 हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. चीननंतर कोरोना युरोपमध्ये विनाश ओढवून घेत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे स्पेनमध्ये 769 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकाच दिवसातील मृत्यूची संख्या ही सर्वाधिक आहे. त्याचबरोबर भारतातही प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 75 नवीन घटना घडल्या आहेत, तर 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणूची 830 हून अधिक प्रकरणे असून 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.