Coronavirus : मुलानं केली एक चूक, 2 आठवडयांपासून वडिल लढतायेत ‘जीवन-मृत्यू’शी संघर्ष

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एका मुलाने वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मास्क न घालता मित्रांसह बाहेर फिरायला गेला. यामुळे संपूर्ण कुटुंबात कोरोनाचा संसर्ग पसरला आणि आता वडील जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहेत. हे प्रकरण अमेरिकेच्या फ्लोरिडाचे आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुलाच्या चुकीमुळे 42 वर्षीय वडील जॉन प्लेसची प्रकृती अधिकच खराब झाली आहे. ते आयसीयूमध्ये दाखल आहेत. आपल्या मुलाकडून त्यांना कोरोना संसर्ग झाला. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन 3 आठवडे झाले आहेत.

जॉन प्लेसच्या पत्नी मिशेल जिमेट यांनी सांगितले की, जॉन यांचे वजन जास्त आहे आणि ते डायबीटिजचे रुग्ण आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या 21 वर्षांच्या सावत्र मुलाला काळजी घेण्याबाबत विनंती केली होती. अहवालानुसार जॉन प्लेस सुमारे 2 आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य संसर्गित असल्याचे आढळले आहे. तथापि, फक्त जॉन यांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

मिशेल जिमेट म्हणाल्या की मुलाने नेहमीच त्यांना आश्वासन दिले होते की काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. त्या म्हणाल्या की कोरोनाच्या तपासणीनंतरही जेव्हा मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा देखील त्यांना खरं वाटत नव्हतं की त्याला संसर्ग झाला असावा.