भारतात स्वदेशी ‘कोरोना’ लसीची मानवी चाचणी, 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील अनेक देश लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही देशांच्या लसीचे मानवी चाचणी करण्यात आली आहे. भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीची मानवी चाचणीला एम्स रुग्णालयात सुरुवात झाली आहे. एका 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. सुत्रांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. भारत बायोटेक या फर्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही कोरोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्यापूर्वी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरला होता. मानवी चाचणी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. यामधून या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात 375 जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. 18 ते 55 वयोगटातील व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 14 दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्यांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. COVAXIN च्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या 12 ठिकाणापैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे.