धक्कादायक ! विलगीकरणासाठी घेऊन निघालेले चौघे पसार, पोलीस आणि प्रशासनाकडून शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी परिसरातील चौघांना संस्थात्मक विलगीकरणासाठी घेऊन जाण्यात येत असताना ते पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘त्या’ चौघांचा पोलिस आणि प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने बिबवेवाडी परिसरातील चौघांचे विलगीकरण केले होते. त्यांना सिंहगड रस्त्यावरील एका शैक्षणिक संस्थेत विलगीकरणासाठी शनिवारी सायंकाळी दाखल केले जाणार होते. रूग्णवाहिकेतून त्यांना शैक्षणिक संस्थेच्या आवारात नेण्यात आले. चौघेजण रूग्णवाहिकेत होते. संस्थात्मक विलगीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत होती. त्यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या रूग्णवाहिकेतून उतरून चौघेजण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, शैक्षणिक संस्थेचा परिसरात डोंगररांगा आहेत. तळजाई टेकडी तसेच आंबेगाव भागापर्यंत हा परिसर आहे. या भागात दाट झाडी आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र,पसार झालेल्या चौघांचा शोध लागला नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.