Coronavirus : कसं बनलं गोवा देशातील पाहिलं ‘कोरोना’मुक्त राज्य, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा कहर वेगाने पसरत असून नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गोव्याने मात्र कोरोनामुक्ती करून दाखवली. यासह गोवा हे कोरोनामुक्त झालेले देशातील पहिले राज्य बनले आहे. आता गोव्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसून त्यासाठी सरकारने खास पावले उचलली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे.

पहिल्या टप्प्यात गोव्यात कोरोनाचे सात रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. सर्व रुग्णांवर उपचार करण्यातआल्यानंतर सातही रुगण बरे झाले. याशिवाय राज्यात कोरोनाचे रुग्णही आढळलेले नाहीत.

कोरोनाला रोखण्यात आलेल्या यशाचे श्रेय पॅथॉलॉजी लॅबची टीम आणि प्रशासनाला देण्यात येत आहे. याशिवाय राज्याने 22 मार्चचा जनता कर्फ्यू 23 आणि 24 मार्चलासुद्धा कायम ठेवला होता. त्यामुळेच कोरोना व्हायरसला रोखता आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच गोव्याच्या सीमा सील करण्यात आल्या. राज्याच्या सीमा सील केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली. त्या सर्वांना क्वारंटाइन करून त्यांची टेस्ट कऱण्यात आली. गोव्यात परदेशातून आलेल्यांचा सर्व्हे करण्यात आला.

त्यापैकी कोणाला कोरोनाची लागण झाली नाही ना याचीही तपासणी केली गेली. यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या गाइडलाइनचे पालन करू. फार्मा कंपन्या आणि फूड इंडस्ट्रीज पहिल्यापासून सुरू आहेत. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार 20 एप्रिलपासून ज्या कंपन्यांना सूट मिळाली आहे त्यांना अटींवर परवानगी दिली आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.