Coronavirus : गेल्या 24 तासात देशामध्ये 43 हजाराहून अधिक ‘कोरोना’चे नवे रुग्ण, मृतांचा आकडा 200 वर पोहचला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना विषाणूची लागण झाल्याची सुमारे 43 हजार 846 नवी प्रकरणे समोर आली आहेत. मागील 24 तासांत देशभरात 197 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर त्याच दरम्यान तब्बल 23 हजार रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळेच भोपाळ, इंदूर आणि जबलपूर येथे आज संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

नुकत्याच आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 43 हजार 846 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा 200 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांत 197 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर 22 हजार 956 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचे सक्रिय प्रकरणे 3 लाखांवर गेली आहेत. सध्या देशभरात कोरोनाचे सुमारे 3 लाख 9 हजार 87 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या अनेक ठिकाणी वाढला आहे. कोरोनामुळे बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या सुमारे 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 59 हजार 755 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 3 हजार 841 लोकांना कोरोना विषाणूची लस दिली आहे.

मध्य प्रदेशातील तीन शहरांत लॉकडाऊन

मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि जबलपूर या तीन शहरांत आज लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 24 तासांत भोपाळमध्ये 345, इंदूरमध्ये 347 आणि जबलपूरमध्ये 116 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात मध्य प्रदेशात 1308 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.