Coronavirus : पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतं ‘हे’ डिव्हाइस, हवेतच पकडणार ‘कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू काही ठिकाणी हवेत उपस्थित आहे की नाही? आगामी काळात हे शोधणे सोपे होईल. कॅनडाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी गेम चेंजिंग उपकरण डिझाइन केले आहे जे हवेतील कोरोना विषाणूचा शोध घेईल.

कंट्रोल एनर्जी कॉर्प (Kontrol Energy Corp) नावाची कंपनी आधीपासूनच घरातील हवेची गुणवत्ता आणि मोनिटरिंग इक्विपमेंट बनविण्यामध्ये गुंतलेली आहे. कोरोना सुरू झाल्यानंतर, कंपनीने कोरोना व्हायरस डिटेक्शन डिव्हाइस डिझाइन करण्याचे काम सुरू केले होते.

कॅनडाच्या ओंटरियो येथे दोन प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूवर संशोधन केल्यानंतर कंपनीने बायोक्लाउड (BioCloud) नावाचे एक उपकरण तयार केले. हे डिव्हाइस हँड ड्रायरसारखे दिसते, ती हवेला आतून ओढते आणि नंतर हवेचे विश्लेषण करते.

globalnews.ca च्या वृत्तानुसार, कंपनीचे म्हणणे आहे की ते डिव्हाइस एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवेत विषाणू असल्यास हे शोधू शकते, जर निकाल सकारात्मक लागला तर तिथे उपस्थित लोकांची स्वतंत्रपणे तपासणी करता येईल. हे डिव्हाइस वर्ग किंवा कार्यालयात देखील उपयुक्त ठरू शकते.

कॅनडामधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड हेनरिक्स यांनी बायोक्लाऊड उपकरणाची चाचणी केली आहे. कंपनी हे डिव्हाइस नोव्हेंबरपर्यंत बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत सुमारे 8.8 लाख रुपये असेल. कंपनीला जगभरातून ऑर्डर मिळण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या कंपनी दरमहा 20 हजार युनिट्सची निर्मिती करू शकते.