एकनाथ खडसेंना जो ‘कोरोना’ होतो त्यावर संशोधन व्हावे !, ‘या’ नेत्याची मागणी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांना यापूर्वीही दोनदा कोरोनाची लागण झाली होती. दोन महिन्यात तिसऱ्यांदा कोरोना झाल्याने भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. खडसे यांना झालेल्या या कोरोनाची चौकशी नव्हे तर संशोधन होण्याची गरज असल्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच आम्हाला त्यांची काळजी वाटते, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

गिरीश महाजन यांनी म्हटले की, राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. एका व्यक्तीला 3-3 वेळा त्याची लागण झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीन वेळा कोरोनाची लागण होत आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी, असं मी म्हणत नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, अशी तीरकस मागणीच महाजन यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत आमच्या जिल्ह्याची अधिक काळजी घेण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली. हा कोणत्या प्रकारचा आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करुन तो पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घ्या, असे महाजन यांनी म्हटले आहे. ते जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचा लोकार्पण सोहळा गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या कोरोनावर भाष्य करताना उपहासात्मक टिप्पणी केली आहे.